हा
प्रसंग तसा प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतोच. आपण कोणाच्या तरी घरी पाहुणे
म्हणून गेलेलो असतो आणि यजमान मोठ्या कौतुकाने त्यांच्या छोट्या पिल्लाला “बेटा,
काकाला ते गाण म्हणून दाखव” किंवा “ शोन्या, त्या गाण्यावर डान्स करून दाखव ” अशी
प्रशंसा मिळवण्याची हमी असलेली गोड विनंती करतात. मग तो “शोन्या- बेटा” त्याच्या
पद्धतीने आणि शैलीत त्या गाण्याचा किंवा डान्सचा गोड आविष्कार सादर करतो.
आपल्या “निर्मितीने” पाहुण्यांचं मनोरंजन केल म्हणून पालक
खुश आणि त्या कोवळ्या कलाकाराचा कलाविष्कार पाहून तो पाहुणा खुश. (कृपया दरवेळी
करमणूक होईलच अशी अपेक्षा करू नये).
तर
सांगायचा मुद्दा असा कि पालकांनीही ह्यावेळी आपला शोन्या- बेटा काय सादर करेल
ह्याची पूर्वतपासणी करून घेणे आवश्यक आहे. कालचाच किस्सा सांगतो. ठाण्यात एका
सीपीई सेमिनारला मला एक जुना मित्र भेटला आणि आग्रहाने त्याच्या घरी घेऊन गेला.
सर्व कसे सुरळीत चालू आहे, त्याची गुजराती बायको कशी अस्खलित मराठी बोलते वगैरे
ओळख परेड झाल्यावर घरातल्या शोन्याने काकाला डान्स करून दाखवायची वेळ आली. आमच्या
गुजराती भाभींनी त्याला लगेच गुजराती फ्लेवरड “राम-लीला” च्या गाण्यावर डान्स करायला सांगितलं.
शोन्या “ राम चाहे लीला, लीला चाहे राम” ह्या आयटम नंबरवर डान्स करणार होता.
शोन्या उगीचच दोन उड्या मारील, ताळमेळ नससेल्या डान्स स्टेप्स करील अशी अपेक्षा
होती. पण त्यांच्या शोन्याच “ओब्झर्वेशन” अगदी बारीक होत. गाण चालू
होणार आहे हे कळताच त्याने शर्ट इन मधून बाहेर काढला आणि शर्टच वरच बटन उघडल. आता
पुढे काय हा विचार करण्याचा वेळाही न देता त्याने डान्स कंटिन्यू केला. शोन्याने
गाण्याच्या सुरुवातीलाच प्रियांका चोप्रा तिचा ड्रेस खोचते आणि तिच्या ड्रेसच वरच
बटन लावते हे पाहिलं होत. ( हो, संजय लीला भन्साळीच्या सिनेमात असल्या डान्स
स्टेप्स असू शकतात. ह्या स्टेप्सशिवायही
गाण चित्रित करता येणे शक्य होत.पुढच्या वेळी कदाचित संपूर्ण कपडे घालतानाच चित्रण
गाण्याच्या ठेक्यावर असेल ). शोन्यानेही त्याच ठेक्यावर आपला शर्ट आत खोचला, मग
शर्टच वरच बटन लावल आणि मगच नाचाला सुरुवात केली. आपल्या शोन्याचा हा आधुनिक
नृत्याविष्कार पाहून थंडगार झालेले त्याच्या पालकांचे चेहरे वर्णन करण्यापलीकडे
पांढरे झाले होते. त्यामुळे सर्व पालकजनांना मी एक सल्ला देऊ इच्छितो कि कृपया
आपल्या शोन्या-बेट्याचे कलासादरीकरण आधी तपासून घ्यावे किंवा असली अनपेक्षित
विपत्ती टाळायची असेल तर असल्या कार्यक्रमांपासून त्यांना काही वर्ष दूरच ठेवावे.
सध्याच्या युगात जे विशी-पंचविशीपर्यंत आपल्या दृष्टीक्षेपात नव्हत, दुर्दैवाने ते
दहा वर्षांच्या मुलांनाही सहज उपलब्ध आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी
आणि चार- चौघातली नाचक्की टाळण्यासाठी कृपया हि काळजी पालकांनी घ्यावी.
***
(Written on 17/11/2013)
No comments:
Post a Comment